चव्हाण यांच्या आमदारकीचा कालावधी संपला

Foto
 पदवीधर मतदारसंघातील तीन, तर शिक्षक मतदारसंघातील दोन आमदारांची मुदत काल रविवारी संपली. त्यामुळे विधान परिषदेच्या रिक्त जागांची संख्या 18 झाली आहे. राज्यपाल निर्वाचित 12 सदस्यांच्या नियुक्‍तीवरून राज भवन विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमधील विसंवाद अद्याप कायम असल्याने या जागा कधी भरणार याबाबत अनिश्चितता कायम आहे.
सतीश चव्हाण (औरंगाबाद पदवीधर), अनिल सोले (नागपूर पदवीधर), श्रीकांत देशपांडे (अमरावती शिक्षक) आणि दत्तात्रय सावंत (पुणे शिक्षक) या चार आमदारांची मुदत रविवारी संपुष्टात आली. तर पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विधानसभेवर निवड झाल्याने पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा रिक्त आहे. विधान परिषदेच्या एकूण 78 पैकी 18 जागा रिक्‍त झाल्या आहेत. राज्यपाल नियुक्‍त 12, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच तर धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था अशा 18 जागा सध्या रिक्‍त आहेत. कोरोनाच्या संकटामुळे निवडणूक आयोगाने मार्चपासून होणार्‍या नियोजित सर्वच निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. यामुळेच नागपूर, औरंगाबाद, पुणे पदवीधर तर अमरावती व पुणे या शिक्षक मतदारसंघांतील निवडणुका लगेचच होण्याची शक्यता नाही. या पाचही मतदारसंघांतील निवडणुका या वर्षांच्या अखेरीस किंवा पुढील वर्षांच्या सुरुवातीला होण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन लगेचच होण्याची शक्यता नाही. पुरवणी मागण्या मंजूर करण्याकरिता आवश्यकता भासल्यास छोटे अधिवेशन होऊ शकते. यामुळेच विधान परिषदेतील 18 जागा रिक्‍त असल्या तरी सरकारच्या वैधानिक कामकाजावर फारसा परिणाम होणार नाही.
राज्यपाल नियुक्‍त जागांचा प्रश्‍न कायम
राज्यपाल नियुक्‍त 12 जागा या 15 जूनला रिक्‍त झाल्या. कोरोना संकटामुळे या जागा भरण्याची घाई करू नका, असा निरोप राज भवनने दिल्याचे सरकारमधील उच्चपदस्थांकडून सांगण्यात येते. याला राज भवनकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.